गुन्हेगारी

१६ लाखांचे डाळिंब घेऊन निघालेला ट्रक गायब; दोघा परप्रांतीयाविरुद्ध गुन्हा दाखल

१६ लाखांचे डाळिंब घेऊन निघालेला ट्रक गायब; दोघा परप्रांतीयाविरुद्ध गुन्हा दाखल

सांगोला (प्रतिनिधी): सांगोला येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाकडून सिलीगुडी (पश्चिम बंगाल) येथे पाठविण्यासाठी देण्यात आलेला तब्बल १२ टन डाळिंबाचा माल, अंदाजे १६ लाख रुपये किमतीचा, निर्धारित ठिकाणी न पोहोचविता परस्पर विल्हेवाट लावून अपहार केल्याची तक्रार पोलिसांत करण्यात आली आहे. याप्रकरणी अनिल मधुकर विभुते यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार ट्रक चालक कमलेश सुरेंद्र राजभर रा. बिरबलपुर, बिहारा, गाजीपुर, उत्तरप्रदेश आणि पंचांग दास यांच्याविरुद्ध सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सांगोला येथील ब्रम्हचैतन्य नगर परिसरात राहणारे श्री. अनिल मधुकर विभुते (वय ३९, व्यवसाय ट्रान्सपोर्ट) यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, त्यांची ए.व्हि. ट्रान्सपोर्ट नावाची कंपनी असून तिचे कार्यालय महूद रोडवरील एच.पी. पेट्रोल पंपासमोर आहे. शेतकरी व व्यापाऱ्यांकडून मिळणारा माल ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश व आसाम आदी राज्यांमध्ये पाठविण्याचे काम या कंपनीमार्फत केले जाते.

दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास आदर्श ट्रान्सपोर्ट अँड लॉजिस्टिक, मुशिराबाद यांच्यामार्फत आयशर ट्रक क्रमांक यू.पी.58 ए.टी.3782 सांगोला येथे पाठविण्यात आला होता. या ट्रकमधून सिलीगुडी येथील व्यापारी लालुभाई यांच्याकडे १२ टन डाळिंब पाठविण्याचे ठरले होते.

सांगोला ते सिलीगुडी या वाहतुकीसाठी १ लाख १५ हजार रुपये भाडे ठरविण्यात आले होते. ट्रक हा गोविंद राधेश्याम जायसवाल, रा. बनियाबारी, गोरखल, संत कबीर नगर, उत्तर प्रदेश यांच्या मालकीचा असून ट्रकवर चालक म्हणून कमलेश सुरेंद्र राजभर आणि पंचांग दास हे दोघे काम करीत आहेत. वाहन चालकांकडून चालक परवाना, आधारकार्ड, वाहनमालकाचे आधारकार्ड, पॅनकार्ड तसेच वाहनाची कागदपत्रे यांची छायांकित प्रती घेण्यात आल्याचेही विभुते यांनी सांगितले.

दि. २१ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेपर्यंत ट्रकमध्ये १२ टन डाळिंबाचे एकूण १,१८२ बॉक्स भरण्यात आले. या मालाची ए.व्हि. ट्रान्सपोर्टमार्फत बिल्टी क्रमांक १२९५ तयार करण्यात आली होती. वाहनचालकांना ३० हजार ८०० रुपये रोख अँडव्हान्स देण्यात आले, तर १९ हजार २०० रुपयांचे डिझेल टाकण्यात आले. उर्वरित वाहतूक भाडे सिलीगुडी येथे माल पोहोचल्यानंतर व्यापारी लालुभाई देणार होता.

माल भरल्यानंतर आयशर ट्रक सकाळी सुमारे ११ वाजता सांगोल्यातून सिलीगुडीकडे रवाना झाला. मात्र, २३ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ७ वाजता सिलीगुडी येथील व्यापारी लालुभाई यांनी विभुते यांना फोन करून माल अद्याप पोहोचला नसल्याचे सांगितले. त्याचवेळी ट्रकवरील दोन्ही चालकांचे मोबाईल क्रमांक बंद असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानंतर विभुते यांनी चालक कमलेश राजभर आणि पंचांग दास यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही क्रमांक बंद असल्याचे आढळून आले.

यानंतर ट्रकच्या मालकाशी संपर्क साधला असता, सदर वाहन बनारस येथील फायनान्स कंपनीच्या यार्डमध्ये जमा असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे माल नेमका कुठे गेला, वाहन कोणाच्या ताब्यात होते आणि चालकांचा संपर्क का तुटला, याबाबत संशय निर्माण झाल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे.

ट्रक सिलीगुडी येथे पोहोचल्यानंतरही माल व्यापाऱ्याला मिळाला नसल्याने आणि दोन्ही चालकांशी संपर्क होत नसल्याने अखेर अनिल विभूते यांनी पोलिसांकडे धाव घेतली. चालकांनी विश्वासाने ताब्यात देण्यात आलेला माल सिलीगुडी येथील व्यापाऱ्याकडे न पोहोचविता त्याची परस्पर विल्हेवाट लावून अपहार केला आणि आपली फसवणूक केली, असा फिर्याद विभुते यांनी सांगोला पोलीस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणात चालक कमलेश सुरेंद्र राजभर आणि पंचांग दास यांच्याविरुद्ध कायदेशीर तक्रार करण्यात आली आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!