गुन्हेगारी

नाझरे गावात १ लाख ८६ हजारांचा प्रतिबंधित पानमसाला व तंबाखूचा साठा जप्त

नाझरे गावात १ लाख ८६ हजारांचा प्रतिबंधित पानमसाला व तंबाखूचा साठा जप्त

सांगोला (प्रतिनिधी): सांगोला तालुक्यातील नाझरे येथे राज्यात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सांगोला पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांचा एकूण १ लाख ८६ हजार ९५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी गणेश कदम यांनी सांगोला पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार नाझरे येथील नवाझ नाबिलाल तांबोळी यांच्याविरुद्ध अन्न सुरक्षा व मानदे कायद्यासह भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अनेकवेळा गुटखा विक्रेत्यांवर कारवाई केली जात असली तरी प्रतिबंधित अन्नपदार्थांची साठवणूक, वितरण आणि विक्रीच्या साखळीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, या मालाचा मूळ पुरवठादार कोण, तो कुठून आणला जात होता आणि परिसरात त्याचा पुरवठा कुणाला केला जाणार होता, याचा तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे.

फिर्यादी गणेश महादेव कदम हे अन्न व औषध प्रशासन, सोलापूर येथे अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या फिर्यादीनुसार, ११ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास सांगोला पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नाझरे येथील नवाझ नाबिलाल तांबोळी यांच्या राहत्या घराची तपासणी करण्यात आली. ही कारवाई मपोसई स्नेहल चव्हाण, पोलीस कर्मचारी संकेत गोरे आणि गणेश काळे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. तपासणीदरम्यान महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला सुगंधित पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आढळून आला. संबंधित व्यक्तीकडे साठ्याच्या खरेदीचा स्रोत आणि तो कोणाला पुरवला जाणार होता, याबाबत विचारणा केली असता समाधानकारक माहिती मिळाली नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पंचांसमक्ष करण्यात आलेल्या मोजणीमध्ये विविध ब्रँडच्या पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांचा समावेश असल्याचे समोर आले. जप्त मुद्देमालामध्ये केसरयुक्त विमल पानमसाला, विमल किंग पॅक व बिग पॅक, डायरेक्टर स्पेशल पानमसाला, रत्ना छाप तंबाखू स्पेशल, प्रीमियम आरएमडी पानमसाला, सुपर जेम केसर पानमसाला, रजनीगंधा सुगंधित पानमसाला, एम सुगंधित तंबाखू गोल्ड, व्ही-वन तंबाखूचे विविध पॅक, तुलसी रॉयल जाफरानी जर्दा, प्रीमियम शॉट लक्झरी च्युइंग तंबाखू आणि एसयूपी-९९ तंबाखू यांचा समावेश आहे. फिर्यादीत नमूद केलेल्या तपशिलानुसार, या पदार्थांचे एकूण ८४५ पुडे जप्त करण्यात आले असून त्यांची एकत्रित किंमत १ लाख ८६ हजार ९५० रुपये असल्याचे नमूद आहे.

याप्रकरणी, अन्न सुरक्षा अधिकारी गणेश कदम यांनी सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून नवाझ नाबिलाल तांबोळी रा.नाझरे, ता.सांगोला यांच्याविरुद्ध सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात जप्त झालेला साठा नेमका कोठून आणण्यात आला, त्याचे मूळ मालक कोण आहेत, संबंधित मालाचा पुरवठा करणारे व्यापारी कोण आहेत याची सखोल चौकशी करण्याची केली जात आहे. त्यामुळे सांगोला पोलिसांच्या पुढील तपासाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!