सांगोला नगरपरिषद निवडणुकीत अपक्षांची जोरदार एन्ट्री; प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना धडकी

सांगोला नगरपरिषद निवडणुकीत अपक्षांची जोरदार एन्ट्री; प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना धडकी
सांगोला (प्रतिनिधी) : सांगोला नगरपरिषद निवडणुकीत यंदा अपक्ष उमेदवारांनी असा झंझावाती प्रचार सुरू केला आहे की पक्षीय पॅनल्सच्या गणितात मोठी तफावत निर्माण झाली आहे. प्रभागनिहाय अपक्षांची आघाडी वाढू लागल्याने नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या गोट्यात स्पष्टपणे धडकी भरल्याचे चित्र दिसून येत आहे.
स्थानिक प्रश्नांवर थेट भाष्य, घराघरांत सातत्याने भेटी, आणि राजकारणापेक्षा कामाला प्राधान्य देणारी भूमिका यामुळे अपक्ष उमेदवारांचा प्रभाव झपाट्याने वाढत आहे. पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, फुटके रस्ते, नाल्यांची दुरवस्था या सर्व प्रश्नांवर अपक्ष उमेदवारांनी नेमकेपणाने बोट ठेवत जनतेशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. पक्षीय नेत्यांच्या मोठ्या सभा आणि घोषणा जशाच्या तशाच राहिल्या असताना अपक्ष उमेदवारांच्या जमिनीवरच्या मोहिमा अधिक प्रभावी ठरत असल्याचे दिसून येत आहे.
काही प्रभागांत अपक्ष उमेदवारांना मिळणारा पाठिंबा पाहता पक्षीय गोट्यात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. उमेदवारांवर मतदारसंघ सांभाळण्याचा दबाव, पॅनल सांभाळण्याची कसरत, करावी लागत आहे. पक्षांतर्गत नाराजी, तिकीट वाटपातील असमाधान, आणि कार्यकर्त्यांचा तुटलेला संपर्क यामुळे अपक्ष उमेदवारांना मोठा फायदा होत असल्याचे जाणकारांचे मत आहे मतदारांचा कल यंदा पक्षीय निष्ठेपेक्षा कामाच्या मुद्यांवर झुकत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. “ज्याने काम केले त्यालाच मत” अशी मतदारांची भूमिका असल्याने अपक्ष उमेदवारांसाठी वातावरण अधिकच अनुकूल बनत आहे.
प्रभागात घरोगरी संपर्क, प्रभावी भाषणे, मुद्देसूद नियोजन, स्थानिक प्रश्नांवर थेट बोट ठेवत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न अपक्ष उमेदवारांकडून सुरू आहे. गेल्या काही वर्षांत प्रभागांतील प्रलंबित विकासकामे, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, रस्ते-विजेचे प्रश्न, नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी यावर अपक्ष उमेदवार थेट संवाद साधत असून मतदारांशी जवळीक वाढवत आहेत. निवडणुकीच्या रणधुमाळीत अपक्ष उमेदवारांची ही आक्रमक रणनीती पाहता प्रभागातील लढत अत्यंत रंगतदार होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. काही प्रभागात तर अपक्ष उमेदवारच आघाडीवर असल्याच्या कुजबुजांनी पक्षीय गोट्यात चिंता वाढली आहे.
अपक्षांची वाढती ताकद, पक्षीय गोट्यातील अंतर्गत नाराजी आणि प्रभागनिहाय निर्माण झालेली चुरस लक्षात घेता अंतिम टप्प्यात मोठे उलटफेर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सांगोला नगरपरिषद निवडणूक यंदा केवळ पक्षीय प्रतिष्ठेची नव्हे, तर अपक्ष उमेदवारांच्या वाढत्या प्रभावाचीही खरी परीक्षा ठरणार आहे. मतदारांचा कल कुणाकडे झुकतो याची उत्सुकता शिगेला पोहोचली असून अंतिम क्षणी राजकीय गणिते पलटी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.



