तिप्पेहाळी येथील कॅनलजवळ मध्यरात्री गोळीबार; डोक्यात गोळ्या झाडून तरुणाची हत्या
प्रतापसिंह उर्फ गब्बर करचे खून प्रकरण; दोन्ही संशयित पोलिसांच्या ताब्यात

तिप्पेहाळी येथील कॅनलजवळ मध्यरात्री गोळीबार; डोक्यात गोळ्या झाडून तरुणाची हत्या
प्रतापसिंह उर्फ गब्बर करचे खून प्रकरण; दोन्ही संशयित पोलिसांच्या ताब्यात
सांगोला (प्रतिनिधी): सांगोला तालुक्यातील तिप्पेहाळी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास पिस्तुलातून गोळ्या झाडून प्रतापसिंह ऊर्फ गब्बर ज्ञानू करचे (वय ३२, रा. पाचेगाव बुद्रुक, ता. सांगोला, जि. सोलापूर) यांचा खून झाल्याची धक्कादायक घटना २७ ऑक्टोबर २०२६ रोजी उघडकीस आली आहे. या प्रकरणी मयत प्रतापसिंह उर्फ गब्बर करचे यांची पत्नी अर्चना करचे यांनी सांगोला पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोन संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्या अटकेची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, प्रतापसिंह ऊर्फ गब्बर करचे हे २७ ऑक्टोबर रोजी रात्री सांगोला येथून किडेबिसरीच्या दिशेने जात होते. रात्री सुमारे १.४६ ते १.५८ या वेळेत तिप्पेहाळी येथील कॅनलजवळ ही घटना घडली आहे. या प्रकरणातील संशयित बालाजी ऊर्फ हर्षवर्धन नामदेव ऐवळे आणि विकी शिवाजी घेरडे (दोघेही रा. किडेबिसरी, ता. सांगोला, जि. सोलापूर) यांनी संगनमत करून प्रतापसिंह उर्फ गब्बर करचे हे चारचाकी वाहन चालवत असताना पाठीमागून त्यांच्या डोक्याच्या उजव्या बाजूस पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. या गोळीबारात प्रतापसिंह उर्फ गब्बर करचे हे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
मृत प्रतापसिंह उर्फ गब्बर करचे यांच्या पत्नी अर्चना प्रतापसिंह ऊर्फ गब्बर करचे (रा. पाचेगाव बुद्रुक, ता. सांगोला) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१), ३(५) तसेच शस्त्र अधिनियमाच्या कलम ३ व २५ अन्वये कारवाई करण्यात येत आहे. हत्येमागील नेमके कारण काय, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक प्रेरणा कट्टे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे, पोलिस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यांनी तपासाच्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
या खून प्रकरणातील बालाजी उर्फ हर्षवर्धन नामदेव ऐवळे आणि विकी शिवाजी घेरडे, दोघे रा. किडेबिसरी, ता. सांगोला या दोन्ही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळावरील परिस्थिती, गोळीबारात वापरलेले शस्त्र, गुन्ह्यामागील संभाव्य कारण आणि घटनेशी संबंधित अन्य बाबींचा तपास सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल देशपांडे करीत आहेत.



