चोपडीत चोरट्यांचा धुमाकूळ! घरातील कपाट फोडून ४.७५ लाखांचे दागिने लंपास
अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

चोपडीत चोरट्यांचा धुमाकूळ! घरातील कपाट फोडून ४.७५ लाखांचे दागिने लंपास
अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
सांगोला (प्रतिनिधी): सांगोला तालुक्यातील चोपडी येथे घरातील सर्व कुटुंबीय झोपेत असताना अज्ञात चोरट्यांनी बेडरूममधील कपाटातून ४ लाख ७५ हजार ६६२ रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. घरातील सदस्यांना याची कोणतीही चाहूल न लागल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चोपडी येथील वैशाली भीमराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी वैशाली पाटील या पती भीमराव, सासू, सासरे, दीर, जाऊ, मुले व इतर कुटुंबीयांसोबत चोपडी येथे एकत्र राहतात. त्यांचे पती ठाणे येथील कासारवडवली परिसरात खासगी सुरक्षा कंपनीत नोकरी करतात. तर त्यांचे दीर शेती व्यवसाय करतात. घरातील कुटुंबीयांना तसेच मुलांना वेळोवेळी मिळालेले सोन्या-चांदीचे दागिने फिर्यादी बेडरूममधील जुन्या पत्र्याच्या कपाटातील एका कप्प्यात ठेवत होत्या. कपाटातील दागिने ठेवण्याच्या कप्प्याला कुलूप लावून त्याची चावी कपाटातील दुसऱ्या कप्प्यात ठेवण्याची त्यांची पद्धत होती. घरात अनेक सदस्य एकत्र राहत असल्याने आणि यापूर्वी चोरीची घटना घडली नसल्याने घरात चोरी होईल, अशी शंका त्यांना आली नव्हती.
फिर्यादीच्या जबाबानुसार, रात्री सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास त्या आपल्या मुलीसोबत बेडरूममध्ये झोपल्या होत्या. त्यावेळी घरातील इतर सदस्यही झोपले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सुमारे ७.३० वाजता त्या उठल्या असता, समोर असलेल्या कपाटाचे दोन्ही दरवाजे उघडे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. संशय आल्याने त्यांनी कपाटातील दागिन्यांची तपासणी केली. त्यावेळी दागिने ठेवलेला कप्पा उघडा दिसला आणि त्यामध्ये ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. 20 हजार रु. किमतीचे 06 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनीमंगळसूत्र, 94 हजार 500 रु. किमतीचे 27 ग्रॅम वजनाचे सोन्याचे साखळीतील मनीमंगळसुत्र, 87 हजार 500 रु. किमतीचे 25 ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस, 7 हजार रु. किमतीचे 2 ग्रॅम वजनाचे कानातील टॉप्स, 24 हजार 500 रु. किमतीचे 2 ग्रॅम वजनाचे सोन्याचे बदाम व 5 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, 1 लाख 5 हजार 000 रु. किमतीचे 30 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या 5 अंगठ्या, 1 लाख 5 हजार रु. किमतीचे 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठन, 11 हजार रु. किमतीचे 100 ग्रॅम वजनाचे चांदीचे ताट व समई व करंड, 5 हजार रु. किमतीचे 57 ग्रॅम वजनाचे चांदीचे पायातील पैंजण जोड, 2 हजार रु. किमतीचे 27 ग्रॅम वजनाचे चांदीचे पायातील जोडवी, 2 हजार 489 रु. किमतीचे 34 ग्रॅम वजनाचे चांदीचे पायातील पैंजण जोड, 1 हजार 563 रु. किमतीचे 20 ग्रॅम वजनाचे चांदीचे नथीचे जोडवीचे जोड, 6 हजार 877 रु. किमतीचे 57 ग्रॅम वजनाचे चांदीचे राखी, पैंजण जोड, व जोडवी जोड, 3 हजार 233 रु. किमतीचे 47 ग्रॅम वजनाचे चांदीचे पायातील पैंजण जोड असा एकूण 4 लाख 75 हजार 662 रु. किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने लंपास केले.
त्यांनी दागिन्यांचा शोध घेतला; मात्र ते मिळून आले नाहीत. त्यामुळे अज्ञात व्यक्तीने हे दागिने चोरून नेल्याचा संशय व्यक्त करत त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. घरात कुटुंबीयांची वर्दळ असतानाही बेडरूममधील कपाटातून मोठ्या किमतीचे दागिने चोरीला गेल्याच्या या घटनेमुळे घरातील मौल्यवान वस्तूंच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.



